चिपळूण : परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित सुरेश दामोदर गद्रे इंग्लिश मिडीअम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज येथे दि. २४ जून २०२६ रोजी इयत्ता दहावी, बारावी तसेच सी.ई.टी. परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमाची सुरुवात प. ए. सोसायटीचे सहसेक्रेटरी व प्रशालेचे चेअरमन श्री. विनोद फणसे, संस्थेच्या सदस्या सौ. सुरंगा अभ्यंकर व सौ. प्राजक्ता ओक तसेच प्रशालेचे सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दिपप्रज्वलनाने करण्यात आली.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. पद्मजा येसादे यांनी मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. उपस्थित मान्यवरांचा परिचय प्रशालेच्या सहाय्यक शिक्षिका व कार्यक्रम विभाग प्रमुख सौ. स्नेहा भागवत यांनी करून दिला. यानंतर इयत्ता आठवी व नववीतील नागालँडच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर करून कार्यक्रमाची रंगत अधिक वाढवली.
त्यानंतर इ. बारावीमध्ये उत्तीर्ण झालेले पहिल्या तीन गुणवंत विद्यार्थी तसेच सी.ई.टी.मध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा आढावा प्रा. रिमा लटके यांनी घेतला, तर इ. दहावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या पहिल्या तीन गुणवंत विद्यार्थ्यांचा आढावा सौ. स्नेहा भागवत यांनी घेतला. त्यानंतर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या यशामागील प्रेरणा, मेहनत, सातत्यपूर्ण अभ्यास आणि अनुभव मनोगताच्या माध्यमातून व्यक्त केले.
यावेळी मुख्याध्यापिका सौ. पद्मजा येसादे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अभ्यासाचे महत्त्व अधोरेखित केले. “अभ्यास हा केवळ गुण मिळवण्याचे साधन नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा, विचारसमृद्धीचा आणि उज्ज्वल भवितव्याचा भक्कम पाया आहे,” असे त्या म्हणाल्या. सातत्य, आत्मविश्वास, एकाग्रता आणि वेळेचे योग्य नियोजन यांच्या बळावर कोणतेही यश संपादन करता येते, असेही त्यांनी नमूद केले.
