मुंबई ( विशेष प्रतिनिधी)- अत्यंत अरुंद, खड्डेमय आणि धोकादायक असणारे आंबेनळी आणि कुंभार्ली हे दोन्ही घाट मजबूत आणि उत्तम दर्जाचे करण्यात यावेत अशी मागणी चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी काल विधानसभेत लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत सहभागी होत मांडली.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या पोलादपूर- महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटाच्या रुंदीकरणासाठी तसेच घाटात आपत्कालीन मदत यंत्रणा तैनात ठेवण्यासाठी अमीन पटेल भास्कर जाधव सुनील प्रभू,डॉ. जितेंद्र आव्हाड आदी सदस्यांनी नियम १०५ अन्वये लक्षवेधी सूचना मांडली. तेव्हा सुनील प्रभू आणि अमीन पटेल यांनी हा घाट किती धोकादायक आहे,सरकार काय उपाययोजना करणार असे प्रश्न विचारले.

या चर्चेत सहभागी होत आमदार शेखर निकम म्हणाले की, आंबेनळी प्रमाणेच चिपळूण वरून जाणारा कुंभार्ली घाटही कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडतो. आंबेनळी घाटामध्ये कोकण कृषी विद्यापीठाची बस कोसळून अनेक कर्मचारी मृत्युमुखी पडले होते त्याचप्रमाणे कुंभार्ली घाटातही वारंवार अपघात घडतात. हे दोन्ही घाट महत्त्वाचे असून सुरक्षेच्या दृष्टीने कुंभार्ली घाटात कोणतीही उपायोजना नाही. त्यामुळे हे दोन्ही घाट उत्तम दर्जाच्या करण्यात यावेत अशी मागणी असून सरकार हे दोन्ही घाट उत्तम दर्जाचे करणार का असा प्रश्न त्यांनी विचारला.