लांजा : आगामी ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर लांजा पोलीस ठाण्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या उपस्थितीत तालुक्यातील मुस्लिम समाजातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली.

येत्या २६ ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद सण सर्वत्र साजरा होणार आहे. या निमित्ताने लांजा पोलीस ठाणे येथे शनिवारी बैठक पार पडली. या बैठकीत लांजाचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी बोलताना ईद-ए-मिलादच्या मिरवणूक आणि धार्मिक कार्यक्रमांबाबत महत्वाच्या सूचना दिल्या. यामध्ये मिरवणुकीचे मार्ग, वेळेचे बंधन आणि ध्वनीप्रदूषण संदर्भातील शासकीय नियमांचे पालन करावे. तसेच वाहतूकीला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी.

हा सण आनंदाचा आणि सलोख्याचा संदेश देणारा असतो. त्यामुळे कोणत्याही नागरिकाने सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट किंवा अफवांवर विश्वास न ठेवता सलोखा राखत काही संशयास्पद आढळल्यास थेट पोलीसांशी संपर्क साधावा, असे आवाहन निळकंठ बगळे यांनी केले.