दापोली : दापोली-खेड मार्गावरील टाळसुरे शाळेजवळ एक महिला रस्त्याच्या कडेला पडलेल्या अवस्थेत आढळून आल्याने ग्रामस्थांनी त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दापोली तालुक्यातील टाळसुरे येथील शिल्पा सुरेश साळवी (वय ४६, रा. टाळसुरे, आष्टाची वाडी) या आज सकाळी नेहमीप्रमाणे कामावर गेल्या होत्या. संध्याकाळी सुमारे ६.३० वाजता घरी परतत असताना त्या टाळसुरे शाळेजवळ पडलेल्या अवस्थेत आढळून आल्या. त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, दापोली येथे दाखल करण्यात आले. मात्र, उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्या मयत असल्याचे घोषित केले.
त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, त्यांना अज्ञात वाहनाची धडक बसली आहे की अन्य कोणत्या कारणामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे, याचा तपास पोलीस करीत आहेत.