लांजा : (गोविंद चव्हाण) लांजा शहरातील गणेश मंगल कार्यालय, संतोष व संजय आग्रे यांच्या हॉलमध्ये भव्य-दिव्य कार्यक्रम पार पडला.
लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी यांचा ६१ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला विविध पक्षांतील राजकीय कार्यकर्ते, शासकीय अधिकारी, शेतकरी वर्ग तसेच महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावर माजी शिवसेना तालुकाप्रमुख संदीप दळवी, माजी सभापती चंद्रकांत मणचेकर, पंचायत समितीच्या माजी सभापती मानसी आंबेकर, लांजा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सावली कुरूप, उपनगराध्यक्ष लांजेकर, नगरसेविका रसीका मेस्त्री, संपदा वागधरे, प्रणीता बोडस, नगरसेवक योगेश कावतकर तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. त्यांना प्रमाणपत्र, बक्षिसे तसेच शाळेसाठी दप्तरांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर बचत गटांचाही गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. प्रास्ताविक शिवसेना तालुकाप्रमुख गुरूप्रसाद देसाई यांनी केले, तर सूत्रसंचालन सचिन डोंगरकर यांनी केले. अनेक मान्यवरांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाची सांगता आभारप्रदर्शनाने करण्यात आली. उपस्थित सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
