रायगड : रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात घडलेल्या मयूर वनगे मारहाण प्रकरणाने गंभीर वळण घेतले असून, घटनेला तीन दिवस उलटूनही चारही आरोपी पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. या घटनेमुळे पेण तालुक्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पेणजवळील कामार्ली येथील वनगे फार्महाऊसवर शनिवारी रात्री व्यावसायिक मयूर वनगे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून, पनवेल येथील गांधी रुग्णालयात त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मयूर वनगे मृत्यूशी झुंज देत असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.
या प्रकरणात भाजपचे दक्षिण रायगड उपजिल्हाध्यक्ष मंगेश दळवी यांच्यासह हरेष दळवी, रुपेश दळवी आणि रंजीत दळवी या चौघांविरोधात पेण पोलीस ठाण्यात प्राणघातक हल्ला, जीवे मारण्याची धमकी आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, मयूर वनगे हे फार्महाऊसच्या स्वयंपाकघरात बसले असताना चौघांनी अचानक मागून येत त्यांच्यावर बेदम मारहाण केली. यावेळी मंगेश दळवी यांनी रिव्हॉल्वरचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
घटनेला तीन दिवस उलटूनही आरोपी फरार असल्याने मयूर वनगे यांच्या पत्नी निना वनगे यांनी थेट रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांची भेट घेत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे.
यावेळी पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू असून, “सर्व आरोपींना लवकरच अटक केली जाईल,” अशी ग्वाही दिल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.
दरम्यान, या प्रकरणाकडे संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले असून, आरोपींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी कुटुंबियांसह नागरिकांकडून जोर धरू लागलीये .
मयूर वनगे मारहाण प्रकरणाला तीन दिवस; चारही आरोपी अद्याप फरार, भाजपच्या दक्षिण रायगड उपजिल्हाध्यक्षासह चार जणांविरोधात गुन्हा;….
