मुंबई : दुसऱ्या पत्नीचा मुलगाही अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी पात्र ठरू शकतो, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने दिला आहे. न्यायमूर्ती एन. बी. सूर्यवंशी आणि न्यायमूर्ती आबासाहेब डी. शिंदे यांच्या खंडपीठाने हा निकाल देत संबंधित याचिकाकर्त्याच्या अर्जाचा नियमानुसार विचार करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
या प्रकरणातील याचिकाकर्त्याचे वडील ‘नेहरू युवा केंद्रा’मध्ये शिपाई म्हणून कार्यरत होते. २०१८ मध्ये त्यांचे निधन झाल्यानंतर कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी याचिकाकर्त्याने अनुकंपा तत्त्वावर नोकरीसाठी अर्ज केला होता.
मात्र, तो दुसऱ्या पत्नीचा मुलगा असल्याचे कारण देत प्रशासनाने त्याचा अर्ज प्रलंबित ठेवला. याविरोधात याचिकाकर्त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली.
न्यायालयात कोणते मुद्दे मांडले?
याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या ‘मुकेश कुमार विरुद्ध युनियन ऑफ इंडिया’ या निकालाचा आधार घेत दुसऱ्या पत्नीच्या मुलाला अनुकंपा नोकरी नाकारणे योग्य नसल्याचा युक्तिवाद केला.
त्यांनी न्यायालयाला सांगितले की, शासनाच्या अनुकंपा योजनेत दत्तक मुलालाही नोकरीसाठी पात्र मानले जाते. दत्तक मुलाचा मृत कर्मचाऱ्याशी रक्ताचा संबंध नसतो. त्याउलट दुसऱ्या पत्नीचा मुलगा हा मृत कर्मचाऱ्याचा जन्मदाता मुलगा असल्याने त्याचा दावा अधिक मजबूत आहे.
न्यायालयाने काय आदेश दिले?
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने याचिकाकर्त्याची बाजू ग्राह्य धरली. प्रशासनाने त्याच्या अनुकंपा नियुक्तीच्या अर्जाचा नियमानुसार आणि सकारात्मक विचार करावा, असे निर्देश न्यायालयाने दिले.या प्रकरणात ॲड. अजिंक्य रेड्डी यांनी याचिकाकर्त्याची बाजू मांडली, तर त्यांना ॲड. विष्णू कंदे यांनी सहकार्य केले.
या निर्णयामुळे दुसऱ्या पत्नीच्या मुलांच्या अनुकंपा नियुक्तीशी संबंधित प्रलंबित प्रकरणांनाही नवी दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.