खेड : मनोज जरांगे पाटील यांनी शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ५०० कोटी रुपयांच्या आरोपांवरून केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आपण सर्वोच्च न्यायालयात लढा दिला असून, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी आपली भूमिका असल्याचे कदम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले.

कुणबी समाजामध्ये आपली प्रतिमा मलिन करण्यासाठी काही जणांकडून जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात असल्याचा आरोप करत, समाजामध्ये गैरसमज पसरवून दोन समाजांत दुही निर्माण करण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. काही विघ्नसंतोषी मंडळी आपण कुणबी समाजाच्या विरोधात लढत असल्याचे भासवून समाजाची दिशाभूल करीत आहेत. मात्र, अशा प्रयत्नांना आपण बळी पडणार नसल्याचे कदम यांनी स्पष्ट केले.

कुणबी समाजाला न्याय देण्यासाठी कटिबद्ध!

रामदास कदम यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार करताना, आपण कधीही एका बाजूने बोलणारे किंवा दुटप्पी भूमिका घेणारे नसल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्राला माहिती आहे की, कुणबी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम प्रयत्नशील आहोत. त्यामुळे खोट्या आरोपांच्या माध्यमातून समाजामध्ये विष पसरवून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या हाताला काही लागणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

समाजबांधवांनी अफवांवर विश्वास ठेवू नये!

ज्या समाजाने आपल्यावर आणि योगेश कदम यांच्यावर विश्वास ठेवला आहे, त्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही रामदास कदम यांनी दिली. कुणबी समाजातील सर्व बांधवांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि वस्तुस्थिती समजून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

दरम्यान, दीपावलीच्या पार्श्वभूमीवर रामदास कदम यांनी सर्व समाजबांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या असून, समाजामध्ये सलोखा आणि विश्वास कायम राखण्याचे आवाहन केले आहे.