मुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर अजय महाराज बारस्कर यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. सोशल मीडियावर वैभव कोकाट यांच्या नावाने व्हायरल होत असलेल्या एका ट्विटचा संदर्भ देत बारस्कर यांनी जरांगे पाटील यांना विविध सवाल केले.

जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवण्यात आले, त्यावेळी ठेकेदार किशोर बलांडे यांची उपस्थिती का होती, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच बलांडे यांच्या कंपनीला गेल्या काही वर्षांत कोट्यवधी रुपयांची कंत्राटे कशी मिळाली, याची चौकशी व्हावी, अशी मागणी केली.

आंदोलनात मध्यस्थी करणाऱ्या व्यक्तींशी संबंधित कंपन्यांना कंत्राटे मिळतात का, असा सवाल करत याबाबत जरांगे पाटील यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी बारस्कर यांनी केली. तसेच किशोर बलांडे यांना ईडीची नोटीस आल्याच्या चर्चेचा संदर्भ देत, त्यासाठी आंदोलन मागे घेण्यात आले का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

यावेळी बारस्कर यांनी विखे पाटील यांच्यावरही प्रश्न उपस्थित करत, बलांडे यांना त्यांच्या खात्यातून कोट्यवधी रुपयांची कामे देण्यात आली असल्याचा दावा केला. आंदोलनाच्या काळात जरांगे पाटील यांनी विखे पाटील यांच्यावर टीका केली होती, तर उपोषण सोडताना त्यांच्याबाबत वेगळी भूमिका का घेतली, असा सवालही त्यांनी केला.

दरम्यान, जरांगे पाटील यांच्या जवळच्या व्यक्तींच्या आर्थिक व्यवहारांबाबतही बारस्कर यांनी विविध आरोप केले. या संदर्भात ईडीकडे तक्रार केल्याचा दावा त्यांनी केला असून, चौकशी थांबवण्यात आल्यास ईडी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिला.

तसेच आझाद मैदान पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांबाबत जरांगे पाटील यांनी अपशब्द वापरल्याचा आरोप करत, पोलिसांनी स्वतःहून दखल घेऊन गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही अजय महाराज बारस्कर यांनी केली.