चिपळूण – खेर्डी औद्योगिक वसाहतीतील घरपट्टीच्या मागणी नोटीसा खेर्डी ग्रामपंचायतीकडून जवळ जवळ सर्व उद्योजकांना प्राप्त झाल्या आहेत. शासकीय परिपत्रक ग्राम विकास विभाग क्रमांक – व्हिपीएम-२०१६/प्र क्र.१८९/पंरा-४ दि.१३ सप्टेंबर २०१९ नुसार घरपट्टी एम.आय.डी.सी.कडे जमा करणे आवश्यक आहे.
शासन परिपत्रकानुसार घरपट्टी मागणी नोटीसा ग्रामपंचायतीने स्थानिक एम.आय.डी.सी. कार्यालयात जमा करणे अपेक्षित आहे. सदर घरपट्टी मागणी नोटीसा विहित मुदतीत एम.आय.डी.सी.ने उद्योगांना बजावणे आवश्यक आहे. उद्योजकांनी घरपट्टी एम.आय.डी.सी.कडे जमा करणे आवश्यक आहे. जमा झालेल्या घरपट्टी रक्कमेपैकी ५० टक्के रक्कम एम.आय.डी.सी.ने स्वतःकडे ठेवून ५० टक्के रक्कम ग्रामपंचायतीकडे जमा करावयाची आहे.
घरपट्टी एम.आय.डी.सी.कडे जमा करणे बाबत ग्राम विकास विभागाचेच शासन परिपत्रक असताना, ग्रामपंचायत खेर्डीकडून उद्योजकांना परस्पर घरपट्टी मागणी नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
घरपट्टी एम.आय.डी.सी.कडे जमा करण्याचा शासन निर्णय २०१९ मध्ये होऊन सुद्धा दरवर्षी ग्रामपंचायत खेर्डीकडून उद्योजकांना परस्पर घरपट्टी मागणी नोटीसा बजावण्यात येतात. त्यानंतर दरवर्षी एम.आय.डी.सी. कडून शासन निर्णयाचा उल्लेख करीत घरपट्टी एम.आय.डी.सी.कडेच भरण्याबाबत नोटीस बजावण्यात येतात. त्यामुळे उद्योजकांमध्ये घरपट्टी भरण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी, गट विकास अधिकारी, पंचायत समिती चिपळूण व प्रादेशिक अधिकारी, एम.आय.डी.सी. रत्नागिरी यांनी या विषयात प्राधान्याने लक्ष घालून उद्योजकांमधील संभ्रम दूर करावा, अशी मागणी उद्योजकांकडून होत आहे.