चिपळूण : राष्ट्र–धर्मावर आज चहूबाजूंनी आघात होत आहेत. भारताला मुसलमान राष्ट्र बनवण्यासाठी एक मोठी इकोसिस्टीम कार्यरत आहे. या आघातांना वेळीच रोखले नाही, तर भविष्यात आपले अस्तित्वच धोक्यात येईल म्हणूनच राष्ट्र आणि धर्मरक्षणासाठी सर्व हिंदूंनी एकत्र येऊन संघटित होणे अत्यंत आवश्यक आहे. असे प्रतिपादन युवा कीर्तनकार, महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे खेड तालुका अध्यक्ष हभप शैलेश आंब्रे यांनी केले.ते सनातन संस्थेतर्फे शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवात बोलत होते.
सनातन संस्थेतर्फे देशभरात ८१ठिकणी तर जिल्ह्यात ५ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करण्यात आला.चिपळूणसह दापोली, रत्नागिरी, देवरुख,लांजा अशा ५ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव संपन्न झाले.
श्री. आंब्रे महाराज पुढे म्हणाले की,प्रत्येक हिंदू पालकाने स्वतःच्या घरातूनच छोट्या–छोट्या कृतींच्या माध्यमातून मुलांवर धर्माचरणाचे संस्कार करण्यास प्रारंभ केला पाहिजे. जे बांधव समाजासाठी आणि राष्ट्र–धर्म रक्षणासाठी प्रयत्नशील आहेत, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, ही आजच्या काळाची आवश्यकता आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या या युगातही साधना करणेआवश्यक आहे.ज्याप्रमाणे पाषाणातून सुंदर मूर्ती घडते, त्याचप्रमाणे सद्गुरू साधकांकडून साधना करून घेऊन सामान्य माणसाला शिष्याच्या रूपात घडवतात आणि त्याला आत्मज्ञानाची अनुभूती देतात.गुरुपौर्णिमा हा गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. यासाठी साधक आपल्या गुरुंप्रती तन,मन,धन अर्पण करुन सेवारत असतात असे ते म्हणाले.
यावेळी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य संघटक संजय जोशी यांनीही मार्गदर्शन केले.तसेच यावेळी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ.आठवले यांनी पाठवलेल्या संदेशाचे वाचन करण्यात आले. संस्थेच्या कार्याची व्याप्ती दर्शवणारी ध्वनिफीत दाखवण्यात आली.तसेच सद्यस्थितीत स्वसंरक्षण प्रशिक्षणाची आवश्यकता लक्षात घेऊन यावेळी संस्थेतर्फे स्वसंरक्षण प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.या महोत्सवाचा लाभ ४५०
जिज्ञासू व धर्मप्रेमींनी घेतला.