चिपळूण : आंधळा दळतोय,आणि कुत्रा पीठ खातोय,असा संतापजनक कारभार सार्वजनिक बांधकाम विभागाचा उघडकीस आला आहे.खेरशेत,कळबुशी,पेढांबे वीर रस्त्याला तब्बल अडीच कोटी रुपये मंजूर होऊन चार महिने उलटले तरी अद्याप निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.
बेजबाबदारपणाचा कळस म्हणजे तांत्रिक मान्यतेच्या कागदपत्रांवर कोणतीही तारीख नमूद नाही.हा भोंगळ कारभार जिल्हा परिषद सदस्या तथा स्थायी समिती सदस्या शिवानी संदीप सावंत यांच्या निदर्शनास येताच त्या कमालीच्या संतापल्या आणि थेट पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे धाव घेऊन कारवाईची मागणी केली आहे.त्यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली आहे.
चिपळूण तालुक्यातील अतिशय दुर्गम भाग असलेल्या खेरशेत,कोकरे,नायशी,पेंढाबे,लोहारवाडी वीर या ३८ किलोमीटर रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण कामासाठी अडीच कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते.१७ फेब्रुवारी २०२६ ला हा निधी मंजूर झाल्यानंतर त्याला प्रशासकीय मान्यता देखील देण्यात आली.त्यानंतर १ कोटी २४ लाख इतका निधी प्रत्यक्षात उपलब्ध करून देण्यात आला.तसेच २ कोटी ०९ लाख रुपये खर्चाला तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे.