खेड : खेड तालुक्यातील रजवेल गावातील मेहमूद दाऊद हमदुले यांच्या गुरांच्या वाड्याला आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागून मोठी हानी झाली. या आगीत गुरांचा संपूर्ण वाडा भस्मसात झाला असून तब्बल १७ दुभती जनावरे होरपळून मृत्युमुखी पडली आहेत.

आग इतकी भीषण होती की काही क्षणांतच तिने संपूर्ण वाड्याला विळखा घातला. स्थानिक ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र आगीचा वेग मोठा असल्याने जनावरांना वाचविणे शक्य झाले नाही. या दुर्घटनेत हमदुले कुटुंबाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच भाजपा नेते खेडचे माजी नगराध्यक्ष ॲड.वैभव खेडेकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.

यावेळी ॲड.वैभव खेडेकर त्यांनी मेहमूद हमदुले व त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करत शासनाकडून योग्य ती आर्थिक मदत व नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन दिले.

या दुर्दैवी घटनेमुळे रजवेल परिसरात हळहळ व्यक्त होत असून, प्रशासनाने पंचनामा करून नुकसानग्रस्त कुटुंबाला तातडीची मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

सदर वेळी खेडचे पोलीस निरीक्षक श्री.विवेकजी आयरे, खेडचे तहसीलदार श्री.सुधीरजी सोनवणे, भाजपा अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते श्री.रहीम भाई सहिबोल, श्री.दाऊद हमदुले, भाजपा खेड शहराध्यक्ष श्री.भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा रत्नागिरीला सरचिटणीस श्री.वैजेश सागवेकर, श्री.मनोज दांडेकर, करण वैभव खेडेकर, प्रदीप भोसले, ओवैस, चौगुले तसेच स्थानिक गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.