मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत ट्युरिस्ट परमिटधारक बिनवातानुकूलित वाहनांच्या भाडेपुरवठ्यासंदर्भातील कंत्राटामध्ये गंभीर आर्थिक विसंगती असल्याचा आरोप करत स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांनी आज स्थायी समितीच्या बैठकीत हरकतीचा मुद्दा उपस्थित केला.

सदर कंत्राटाचा कालावधी ५ जून २०२४ ते ४ जून २०२६ असा होता. आता हे कंत्राट संपुष्टात येत असल्याने त्यास डिसेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवला आहे.

यावेळी बोलताना तिवाना म्हणाले की, हे कंत्राट प्रशासक कालावधीत मंजूर करण्यात आले होते. मूळ निविदेनुसार सर्व सात ग्रुपना जवळपास समान स्वरूपाची कामे देण्यात आली असून प्रत्येक ग्रुपला सुमारे ६ कोटी ४३ लाख ६९ हजार ४६८ रुपये इतकी कंत्राटी रक्कम मंजूर करण्यात आली होती. जेव्हा मूळ कंत्राटाची रक्कम समान आहे, तेव्हा केवळ सहा महिन्यांच्या मुदतवाढीसाठी सर्व ग्रुपमध्ये वाढीव रक्कमही समान असणे अपेक्षित आहे. मात्र प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावामध्ये प्रत्येक ग्रुपसाठी वेगवेगळी वाढीव रक्कम दर्शविण्यात आली आहे, ज्यामुळे गंभीर संशय निर्माण होत आहे.