मुंबई-पुणे : द्रुतगती महामार्गावरील बोरघाट परिसरात संभाव्य मोठा अपघात टळल्याची घटना आज घडली. यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या मुंबई लेनवरील कि.मी. ४२.००० जवळील आयओडीशी बोगद्याजवळ सुमारे ५० फूट उंचीवर सुमारे ५ टन वजनाचा मोठा दगड संरक्षण जाळीत (रॉक फॉल बॅरियर) अडकून राहिल्याचे निदर्शनास आले होते.
पावसाळ्याच्या तोंडावर हा दगड खाली कोसळल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन महामार्ग पोलीस केंद्र बोरघाटचे प्रभारी अधिकारी स्वप्नील पाटील यांनी तातडीने परिस्थितीची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, आयआरबी, वाहतूक विभाग आणि संबंधित तांत्रिक यंत्रणांशी समन्वय साधून तातडीची कारवाई हाती घेण्यात आली.
या संदर्भात अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) प्रविण सांखळे यांनी विशेष आदेश जारी करून १८ जून रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत संबंधित भागातील वाहतूक नियंत्रित करण्याचे निर्देश दिले. या निर्णयामुळे दगड हटवण्याचे काम अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडणे शक्य झाले.
या संपूर्ण कारवाईत पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, पोलीस उपअधीक्षक पुष्पलता दिघे, पोलीस निरीक्षक भरत शेंडगे, प्रभारी अधिकारी स्वप्नील पाटील यांच्यासह महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे, खंडाळा आणि वडगाव येथील अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते.
