लांजा: शहरातील गोंडेसखल रोड परिसरात भरवस्तीत घरफोडीची धक्कादायक घटना घडली असून मुलाच्या आजारपणासाठी घरात ठेवलेली तब्बल ९० हजार रुपयांची रोख रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केली आहे. या घटनेतील चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र राजाराम पावसकर (वय ६०, रा.गोंडेसखल रोड, लांजा) यांनी याबाबत लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही घटना १६ जून रोजी रात्री ९.३० ते १७ जून रोजी दुपारी १.५५ या कालावधीत घडली. रवींद्र पावसकर हे कामानिमित्त घराबाहेर गेले होते. १७ जून रोजी दुपारी घरी परतल्यानंतर त्यांना घराचा दर्शनी दरवाजा उघडा दिसला. दरवाजावरील कडी-कोयंडा उचकटल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी घराची पाहणी केली असता हॉलमधील सामान जागच्या जागी होते. मात्र, बेडरूममधील लाकडी कपाटाच्या उजव्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली ९० हजार रुपयांची रोख रक्कम चोरीला गेल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे ही रक्कम त्यांच्या आजारी मुलाच्या उपचारासाठी ठेवण्यात आली होती. दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित चोरटे कैद झाले असून त्याच्या हालचालींचा माग काढण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३३१(४), ३०५ प्रमाणे भादवि कलम ३८०, ४५७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास जाधव अधिक तपास करत आहेत.