रत्नागिरी : “निसर्गाने समृद्ध असलेल्या आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात सध्या काही गावांमध्ये निर्माण झालेली पाण्याची परिस्थिती ही तात्पुरती आहे. मात्र, पावसाचे आगमन लांबल्यामुळे सद्यस्थितीत उपलब्ध पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. नागरिकांनी विहिरी, विंधन विहिरी आणि नळाच्या पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा. ‘पाणी बचतीचा’ हा निर्णय प्रशासनाला सहकार्य म्हणून प्रत्येक नागरिकाने पाळावा,” असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे.

पाऊस लांबल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पाणीटंचाई नियोजनाबाबत जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली.

बैठकीत जिल्ह्यातील धरणांमधील उपलब्ध साठा, इतर स्त्रोतांमधील पाणीसाठा आणि आवश्यक पाणीपुरवठा याबाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात सध्या काही शहरांसाठी पुढील २५ ते ३० दिवस पुरेल इतकाच पिण्याच्या पाण्याचा साठा उपलब्ध असल्याची माहिती यावेळी संबंधित नगरपरिषद/नगर पंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांनी दिली.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि ग्रामीण पाणीपुरवठा यंत्रणेचा आढावा घेऊन टंचाईग्रस्त गावांमधील पाणीपुरवठ्याबाबत आवश्यक माहिती संकलित करावी. त्याबाबतची मागणी कळवावी, अशी सूचनाही जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिली.

बैठकीला अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता अनिरुद्ध जोशी, कार्यकारी अभियंता विवेक सोनार, मुख्याधिकारी वैभव गारवे, फेडरेशन ऑफ रत्नागिरी चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रशांत पटवर्धन, लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. राज आंब्रे, संचालक शिरीष चौधरी, राजेश तिवारी आदी उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे तसेच नगरपरिषद/नगर पंचायतींचे मुख्याधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.