मुंबई : सुरगाणा तालुक्याच्या राजकारणात अनेक दशकांपासून आदिवासी पट्ट्यात मजबूत पकड असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. पंचायत समिती सदस्य विजय घांगळे यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्ते आणि समर्थकांनी मुंबईत भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या सर्व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले.

यावेळी भाजपा नाशिक उत्तर जिल्हाध्यक्ष यतिन कदम, नाशिक दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, आदिवासी मोर्चा प्रदेश सरचिटणीस एन. डी. गावित यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बारा गाव डांग परिसरातील शेकडो सक्रिय कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने हा केवळ पक्षप्रवेश न राहता सुरगाण्यातील बदलत्या राजकीय प्रवाहाचा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. सुरगाणा तालुक्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा दीर्घकाळ प्रभाव राहिला आहे. आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांवर काम करत पक्षाने आपले मजबूत संघटन उभे केले होते. मात्र अलीकडील काळात बदलत असलेली राजकीय परिस्थिती, विकासाच्या अपेक्षा आणि नव्या नेतृत्वावरील विश्वास यामुळे कार्यकर्त्यांनी भाजपाची वाट धरल्याचे यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले.मुंबई