मुंबई : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांनी जनतेची नाहक दिशाभूल करून त्यांची माथी भडकवत यात पक्षीय राजकारण आणू नये तर या भागाचा परिपूर्ण विकास होण्यासाठी चर्चा करून सहमतीने मार्ग काढण्याचे आवाहन कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी बुधवारी केले.

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन आणि भाजपा प्रदेश माध्यम प्रमुख गोविंद येतयेकर उपस्थित होते. या महामार्गाच्या कामात साठ हजार कोटींचा भ्रष्टाचार होईल, असा बिनबुडाचा आरोप करीत जनतेला संभ्रमात टाकण्याचे काम सध्या केले जात आहे. पण 16 धनगरवाड्या असलेल्या या भागाचा विकास करायचा असेल तर महामार्ग हाच पर्याय आहे. या अविकसित भागांचाही सहानुभूतीपूर्वक विचार झाला पाहिजे. रोजगारासाठी या भागातील तरुण-तरुणींना नाईलाजाने बाहेरच्या भागात जावे लागते. त्यांच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. हा प्रकल्प साकार झाल्याने हा प्रश्न मार्गी लागू शकतो, असा विश्वास आ. पाटील यांनी व्यक्त केला.