खेड (प्रतिनिधी) : – तालुक्यातील सुकिवली खडी क्रशर परिसरात बुधवारी १० जून २०२६ रोजी सकाळी झालेल्या भीषण अपघातात डंपर चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. रिव्हर्स घेताना अंदाज चुकल्याने डंपर सुमारे ३५ फूट खोल दरीत कोसळल्याने ही दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार , बुधवार दि.१० जून रोजी सकाळी सुमारे ११:४० वाजण्याच्या सुमारास डंपर क्रमांक (एम. एच. ०८ डब्लू ८४७१) या वरील चालक नितीन विजय पवार (वय २७, रा. चिंचघर-दस्तुरी) रिव्हर्स घेत असताना त्याचा अंदाज चुकला. त्यामुळे डंपर थेट दरीत कोसळला. अपघात इतका भीषण होता की चालक जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच भरणेनाका पुलाखाली सेवेत असलेली जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी संस्थान, नाणीजधाम यांची २४ तास विनामूल्य अपघात मदत रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिका चालक सुरज हंबीर यांनी तत्परता दाखवत उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी येथे दाखल केले.
मात्र, उपचारापूर्वीच नितीन विजय पवार (वय २७, रा. चिंचघर-दस्तुरी) यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, तरुण चालकाच्या अकाली निधनाने शोककळा पसरली आहे.