मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक शेतकऱ्याला दिवाळीपूर्वी मदत म्हणून पाच हजार रुपये देण्याची घोषणा केली. ही अंतिम नाही, तर आगाऊ मदत आहे. पाच हजार रुपयांत शेतकऱ्यांची दिवाळी कशी होणार, असा सवाल करणाऱ्या हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, नाना पटोले, रोहित पवार या सगळ्यांना एकच सांगायचे आहे. शेतकऱ्यांसाठी अवघे अडीच हजार रुपये देत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणाऱ्या कर्नाटकमधील काँग्रेस सरकारला सपकाळ, वडेट्टीवार जाब विचारणार का, असा सवाल भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी गुरुवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
कर्नाटकात दुष्काळ जाहीर केला तेव्हा त्याकडे लक्ष वेधत विरोधक ओरडा करत होते. पण कर्नाटकमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला फक्त अडीच हजार रुपये देत त्यांची थट्टा करण्यात आली तर महाराष्ट्रात देवाभाऊंच्या सरकारने पाच हजार रुपयांची मदत केली. आता अडीच हजार रुपये जास्त की पाच हजार रुपये जास्त, याचे उत्तर काँग्रेस नेत्यांनी द्यावे. कर्नाटक सरकारने ही एकूण मदत दिली आहे तर देवाभाऊंच्या सरकारने तात्पुरती मदत दिली आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आम्ही तुमच्यापेक्षा दुपटीने पुढे आहोत आणि फक्त एवढ्यावरच थांबणार नाही तर पंचनामे झाल्यावर एनडीएच्या नियमानुसार हेक्टरी भरीव मदतीची घोषणा महायुती सरकार करणार आहे. कर्नाटकात एकूण दुष्काळ निवारणासाठी 1,250 कोटी रुपयांची तरतूद केली आहे तर देवाभाऊंच्या सरकारने 6 हजार कोटी रुपयांचा पहिला हप्ता तोही अग्रिम दिलेला आहे. हा आमच्यातला आणि तुमच्यातला फरक आहे, असे श्री. बन यांनी सुनावले.
महाराष्ट्रात आपण चारा छावण्यांसाठी सुमारे 62 कोटी रुपयांची तर कर्नाटकने अवघ्या 25 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. कर्नाटक सरकारने एकाही शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली नाही तर फक्त कर्जवसुलीसाठी एक वर्षाची मुदतवाढ दिली तर देवाभाऊ आणि महायुती सरकारने महाराष्ट्रात शेतकऱ्यांना कर्जमाफी केली आहे. एवढेच नाही, तर आपण थकीत वीजबिलापोटी 48 हजार कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना करतोय आणि त्या मदतीची वसुली केली जात नाही. सुमारे दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ करत आजपर्यंत 58 लाख शेतकऱ्यांना मदत केली. जिथे तुमची सत्ता आहे तिथे तुम्ही पाच हजार रुपये मदत का केली नाही? किमान देवाभाऊंनी केली तेवढी तरी मदत का केली नाही याचा जाब कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याना विचारा, असे श्री. बन यांनी फटकारले.
जनाब संजय राऊत, तुमचा आणि तिरंग्याचा काय संबंध, असा सवाल करत श्री. बन म्हणाले, तिरंगा लावला म्हणून जर का कोणावर कारवाई करायची नसेल, तर मुंबईवर 26/11 चा हल्ला झाला होता, तेव्हा दहशतवादी अजमल कसाब आणि त्याचे साथीदारही त्यांच्या बोटीवर तिरंगा लावून मुंबईत आले होते. त्यावेळेला काँग्रेसचे सरकार होते. आता दहशतवादी तिरंगा लावून आले म्हणून त्यांच्यावर कारवाई करायची नाही का? तुम्ही या देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करता, तुमचे धोरण पाकिस्तान आणि बांगलादेशधार्जिणे आहे. हातात तिरंगा घेऊन तुम्ही या देशाचा बांगलादेश आणि नेपाळ करणार असाल, तर तुमच्यावर कारवाई होणार आहे. तिरंगा या देशाचा स्वाभिमान आणि अभिमान आहे. पण तिरंग्याच्या आड या देशामध्ये दहशत, अराजकता पसरवणे सहन केले जाणार नाही हे संजय राऊत, कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके यांनी ध्यानात ठेवले पाहिजे.
शेतकऱ्यांना अवघे 2,500 रुपये देणाऱ्या कर्नाटक सरकारला सपकाळ, वडेट्टीवार जाब विचारणार का? -भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन…
