वाशिम : “साहेब, ५ हजार रुपयांत काय होणार? शेतकऱ्याचं दुःख एकदा बांधावर येऊन समजून घ्या!” अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून राज्य सरकारवर टीका केली आहे. वाशिम जिल्ह्यातील पांडव उमरा, तांदळी येथे दुष्काळी परिस्थितीची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांना वाट मोकळी झाल्याचा उल्लेख सपकाळ यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे.
शेतातील वाळत चाललेली तूर, चाऱ्याची टंचाई, बहिणीच्या लग्नाची जबाबदारी आणि डोक्यावर असलेले कर्ज, अशा अनेक संकटांचा सामना शेतकरी करत असल्याचे सपकाळ यांनी म्हटले आहे. पोटच्या लेकराप्रमाणे जपलेले पीक डोळ्यांदेखत उद्ध्वस्त होताना पाहणाऱ्या बळीराजाची व्यथा हृदय पिळवटून टाकणारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री महोदय, शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची मदत देऊन त्यांच्या वेदना संपणार नाहीत, असे म्हणत सपकाळ यांनी सरकारच्या मदतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बियाणे, खते, औषधे, मजुरी आणि कर्जाचा वाढता भार लक्षात घेता ही मदत अपुरी असल्याची भूमिका त्यांनी मांडली.
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केवळ छायाचित्रे काढण्यापलीकडे जाऊन सरकारने ठोस निर्णय घ्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली. शेतकऱ्यांना भाषणे आणि आश्वासनांपेक्षा हक्काची मदत आवश्यक असल्याचे सपकाळ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
“शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसता येत नसतील, तर निदान त्यांच्या दुःखाची थट्टा तरी करू नका,” अशा शब्दांत त्यांनी सरकारला सुनावले आहे.