मुंबई : अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना मुंबई बाहेर न जाता मुंबईत समायोजन करा, शिक्षकांचे पगार बंद करु नका, असे निर्देश मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी अनुदानित शाळांमध्ये सन २०२५-२६च्या संचमान्यतेनुसार अनेक शिक्षक अतिरिक्त ठरलेले आहेत. दुसरीकडे बृहमुंबई महानगरपालिकेच्या विविध शाळांमध्ये शिक्षकांची लक्षणीय पदे रिक्त असल्याने खाजगी अनुदानित शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे महानगरपालिका शाळांमधील रिक्त पदांवर समायोजन करावे, अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे अध्यक्ष राजू बंडगर यांनी मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्याकडे केली होती.
याबाबत पालकमंत्र्यांनी बैठक घेऊन सविस्तर आढावा घेतला असता यावेळी 1176 शिक्षक अतिरिक्त आहेत. अशा शिक्षकांना मुंबई बाहेर पालघर, रायगड, रत्नागिरी अशा लगतच्या जिल्ह्यात न पाठवता मुंबईत समायोजित करावे, अशी मागणी शिक्षक आघाडीने घेतली होती. तर ज्या शिक्षकांना मुंबई महापालिका शाळेत समायोजित केले जाईल त्यांचा पगार मुंबई महापालिकेने द्यावा, असे शासनाचे धोरण असल्याचे शिक्षण आयुक्तांनी मांडले. मात्र या शिक्षकांचा पगार महापालिकेतून देता येणार नाही कारण याबाबत गतवर्षी मुंबई महापालिकेने ठराव करुन अशा शिक्षकांचे समायोजन तात्पुरत्या. स्वरूपात करावे, असे धोरण ठरवले आहे. गतवर्षी महापालिकेने 533 शिक्षकांचे समायोजन केले होते.
