चिपळूण : शरद पवार यांना सोडून मी चूक केली. आज पवार साहेबांसोबत मी असायला हवा होतो.कारण राष्ट्रवादीने मला सर्व काही दिले होते. असे असताना मी राष्ट्रवादी पक्ष सोडला ही चूकच केली. ही चूक केली आता पुन्हा तीच चूक करायची नाही, म्हणून आज अडचणीच्या काळात उद्धवजींसोबत ठामपणे उभा आहे अशी अत्यंत प्रांजल कबुली शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिली.

आमदार जाधव म्हणाले की,जे खरे आहे ते बोलणार आहे. कारण होणाऱ्या परिणामाची मी पर्वा करीत नाही. राष्ट्रवादीने मला सर्व काही दिले असे असताना आज मी राष्ट्रवादी पक्ष फुटलेला असताना पवार साहेबांसोबत असायला हवा होतो. मात्र माझ्याकडून चूक झाली असा पुनरुचार त्यांनी केला. या मुलाखतीत आमदार जाधव यांनी अनेक प्रश्नांना रोखठोक उत्तरे दिली.

केंद्र राज्य सरकार आणि भाजपावर टीका

आमदार जाधव यांनी केंद्रा व राज्य सरकार आणि भाजपावर सडकून टीका केली. आ जाधव म्हणाले की,एकीकडे देशात आता कोरोनासारखी स्थिती पुन्ही उद्भवू शकते असं स्वतः पंतप्रधान सांगतात, तर दुसरीकडे राज्यात कशाचाही तुटवडा नाही असं मुख्यमंत्री सांगतात. मात्र अनेक ठिकाणचे पेट्रोल पंप बंद आहेत, एलपीजी गॅसचा तुटवडा आहे. सरकारने आता केरोसिन देण्याचंही जाहीर केलं आहे. अफवा पसरवण्यात भाजपचा कुणीच हात धरू शकत नाही. उद्धव ठाकरे यांच्यामुळे गॅस, पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्या आहेत, असं सांगितलं नाही म्हणून मी भाजपला धन्यवाद देतो असा टोलाही त्यांनी लगावला.

काँग्रेसच्या काळातील साडेचारशे रूपयांना मिळणारा गॅस आता हजार-बाराशेला मिळतोय, असं असले तरी भाजपवाले काँग्रेसवर टीका करतात.पंतप्रधान स्वतः सांगतात की,कोविड सारखी स्थिती आहे आणि आपले पुढारी काहीच झालं नाही अशा बढाया मारतात.तुमच्याकडे सगळं भरपूर आहे असं सांगता, मग राज्यात बंद असलेलें केरोसिन रेशनवर द्यायचा निर्णय का घेतला, असा प्रश्नही त्यांनी विचारला. अफवा पसरवण्यात भाजपचा कुणीही हात धरू शकत नाही. फक्त आजच्या परिस्थितीला नेहरू आणि उद्धव ठाकरे हे जबाबदार आहेत असा आरोप भाजपने केला नाही, याबद्दल आपण भाजपला धन्यवाद देतो असा टोला भास्कर जाधव यांनी लगावला.

२०१४ पासून देशात अंधश्रद्धेवर लोकांचा खूप विश्वास बसायला लागलाय. भोदूंगिरी, भगतगिरी बाबा आणि साधू सगळे चमत्कार घडवतात असा लोकांचा समज झाला आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा प्रकार देखील सुरू झाला. राजकारणी लोक सुद्धा बाबा-बुवांच्या च्या मागे लागले. भगतगिरी किंवा बाबा बुवा यांच्या माध्यमातूनच सत्तेचा मुकुट घालता येईल असा अनेकांचा समज झाल्याचं दिसतंय. भोंदू बुवांचे पाय धरल्यामुळे राजकारणी लोकांची प्रगती झाली, मग तशी प्रगती होण्यासाठी आम्हाला देखील भोंदूबाबांकडे जायला हवं असा समज काही राजकीय लोकांच्या वागण्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये पसरला आहे. अशोक खरात प्रकरण हा त्यातीलच एक प्रकार आहे.असा शाब्दिक हल्ला त्यांनी केला.