मुंबई : उन्हाळा असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना आरोग्याच्या दृष्टीने पुरेसे पाणी पिण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनावर टीका करणाऱ्या संजय राऊत यांना महाविकास आघाडीचे सरकार असताना राज्यात किराणा दुकानांवर वाईनविक्री करण्याची परवानगी द्या, असा प्रस्ताव कोणी आणला होता याची आठवण राहिलेली नाही.

त्यात संजय राऊत यांच्या संबंधातील कंपनी कुणाची होती, हे महाराष्ट्र विसरलेला नाही. तुमचे धोरण वाईन प्या असे होते, तर पंतप्रधानांचे धोरण पाणी प्या असे आहे. त्यामुळे ‘पाणी प्या’ म्हटल्यानंतर वाईन प्यायल्यासारखे बोलू नये, अशी बोचरी टीका भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शुक्रवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. बन बोलत होते.

भारताकडे पुरेसा इंधनसाठा शिल्लक असल्याचे स्पष्ट करत श्री. बन म्हणाले की, काही लोक जाणीवपूर्वक डिझेल – पेट्रोलचा साठा करत असल्याने काही जिल्ह्यांमध्ये नेहमीपेक्षा 50 ते 75 टक्के मागणी वाढलेली आहे. कारण काहीजण साठेबाजी करून पेट्रोल – डिझेलचा काळाबाजार करण्याचा प्रयत्न करत आहेत. राहिला प्रश्न इंधन दरवाढीचा, तर चीनमध्ये जवळपास 25 ते 30 टक्के इंधन दरवाढ झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींमुळे आपल्याकडे केवळ चार ते पाच टक्केच इंधन दरवाढ झाली आहे. युद्धाची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर हे दर पुन्हा नियंत्रणात येतील. सर्वसामान्य नागरिकांना झळ बसू नये यासाठी सरकार विशेष प्रयत्न करत आहे.