मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) तर्फे वाढती महागाई, इंधन दरवाढ, बेरोजगारी आणि महाराष्ट्रातील ढासळती कायदा-सुव्यवस्था याविरोधात बुधवार, दि. ३ जून २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता नवी मुंबई येथील सिडको प्रदर्शन केंद्र (CIDCO Exhibition Centre) येथे भव्य आंदोलन-मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) च्या कार्याध्यक्षा व खासदार सुप्रिया सुळे करणार असून, त्यांच्यासमवेत प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, ज्येष्ठ नेते जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार तसेच पक्षाचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. याबाबत अधिक बोलताना महेश तपासे पुढे म्हणाले “देशातील सर्वसामान्य नागरिकांना चारही बाजूंनी पिळवणूक सहन करावी लागत आहे. पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलपीजीच्या दरातील प्रत्येक वाढ थेट नागरिकांच्या घरगुती अर्थसंकल्पावर घाव घालते आणि जीवनावश्यक खर्च आणखी वाढवते. एकीकडे नागरिक आर्थिक संकटाशी झुंज देत असताना केंद्र आणि राज्य सरकारे मात्र जनतेच्या वास्तव समस्यांपासून दूर असल्याचे दिसून येत आहे. वाढती बेरोजगारी आणि वाढता गुन्हेगारीचा आलेख यामुळे जनतेतील असंतोष अधिक तीव्र झाला आहे. हा मोर्चा म्हणजे दुर्लक्षित, आर्थिक ओझ्याखाली दबलेल्या आणि सरकारच्या जनविरोधी धोरणांमुळे त्रस्त झालेल्या प्रत्येक नागरिकाचा आवाज आहे.”