मुंबई : माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी शनिवारी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते विजय चौधरी, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन, माध्यम विभाग प्रमुख गोविंद येतयेकर आदी उपस्थित होते. श्री. तनपुरे हे २०१९ मध्ये राहुरी मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये ते राज्यमंत्री होते.
यावेळी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले, “राहुरी मतदारसंघातील नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीच्या वेळी मी माझ्या सहकाऱ्यांसोबत प्राजक्त तनपुरे यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी त्या विधानसभा मतदारसंघातील तिन्ही तालुक्यांतील अनेक महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची तयारी त्यांनी दर्शविली. त्यांना जनतेच्या प्रश्नांची उत्तम जाण आहे. वर्षानुवर्षे समाजातील अनेक घटकांसोबत त्यांनी काम केले आहे. ज्या विश्वासाने श्री. तनपुरे यांनी भाजपात प्रवेश केला आहे, त्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही. भाजपा संघटना त्यांच्या पाठीशी उभी राहील,” अशी ग्वाहीही श्री. चव्हाण यांनी दिली.
