पुणे : केंद्र सरकारच्या गृहविभागाच्या अहवालानुसार पुणे शहर गुन्हेगारीच्या बाबतीत राज्यात पहिले तर देशात पाचवे शहर बनले आहे. पुण्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे. त्यामुळे पुण्याच्या पोलिस आयुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठवा, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.

सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या की, केंद्र सरकारच्या गृहविभागाच्या अहवालानुसार पुणे शहर गुन्हेगारीच्या बाबतीत राज्यात पहिले तर देशात पाचवे शहर बनले आहे. त्यामुळे पुण्याच्या पोलिस आयुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठवा. मुख्यमंत्र्यांवर आमचा विश्वास आहे. नसरापूर प्रकरणातदेखील आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. पोलिसांनी लवकर आरोपपत्र (चार्जशीट) दाखल केले, मात्र हे गुन्हे रोखले पाहिजेत. तसेच हे सरकारचे अपयश आहे. हप्ते घेऊन गुन्हे केले जात आहेत, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पार्थ पवार आणि छगन भुजबळ साहेब यांच्या गटात काय होत आहे, हे मला माहीत नाही. मला त्यात स्वारस्य नाही. मात्र काल एक व्हिडिओ माझ्याकडे आला आहे. मी कोणताही आरोप केलेला नाही. याबाबत तुम्ही भुजबळ साहेबांनाच विचारा. भुजबळ साहेब यांच्या खात्यातील एका कंत्राटदाराने असा दावा केला आहे की, गेली काही वर्षे काही ठरावीक कंत्राटदारच पुरवठ्याचे काम करत आहेत. त्यामुळे यात भ्रष्टाचार होत असेल, तर त्याची चौकशी व्हावी. याबाबत मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे. मुख्यमंत्री सामान्य नागरिकांचा पैसा वाचवतील, अशी मला अपेक्षा आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.