खेड (प्रतिनिधी) : – कोकण आयुर्वेद या वैद्यकीय संस्थेचे संस्थापक सुर्यकांत नलवडे यांना विनामोबदला नाडी परीक्षण सेवा देत समाजोपयोगी कार्य केल्याबद्दल नुकताच ” आयुष ग्लोबल पुरस्कार ” प्रदान करण्यात आला. या पुरस्काराबद्दल खेड शहरातील अथर्व हाईट येथील कोकण आयुर्वेद केंद्रात विविध मान्यवरांनी भेट देत त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी उद्योजक प्रवीण छपरे यांच्यासह खेडमधील अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी नलवडे यांच्या सामाजिक व आरोग्यविषयक कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना सुर्यकांत नलवडे यांनी सांगितले की, “दि. ३१ मे रोजी सातारा जिल्ह्यातील वाठार स्टेशन (ता. कोरेगाव) येथे वाग्देव महाराज यांच्या चरणी हा पुरस्कार अर्पण करणार आहे.” यावेळी पत्रकार अनुज जोशी, अनिल तांबे आदींसह मान्यवर उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षांपासून नाडी परीक्षणाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना आरोग्य सेवा देण्याचे कार्य नलवडे करत असून त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे.