मुंबई : काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद हे १ ऑक्टोबरपासून पाच दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. गुरुवारी सकाळी त्यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर त्यांनी शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. दुपारी १२.१५ वाजता दादर येथील चैत्यभूमीवर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून दुपारी १ वाजता टिळक भवन (MPCC मुख्यालय) येथे त्यांचे आगमन झाले.
पाच दिवसांच्या या दौऱ्यात डॉ. प्रसाद यांनी आपला पदभार स्वीकारला. प्रदेश काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक तसेच जिल्हाध्यक्षांशी संवादाचे आयोजन करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह राज्यातील ज्येष्ठ नेते, आमदार आणि खासदार यांच्याशीही त्यांनी चर्चा केली.
२ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त त्यांनी मणिभवनला भेट दिली. त्यानंतर शांती आश्रम येथे आयोजित सर्वोदय मंडळाच्या कार्यक्रमास ते उपस्थित राहिले. दुपारी २ वाजता प्रदेश काँग्रेसच्या विविध विभाग आणि आघाड्यांच्या राज्य प्रमुख व अध्यक्षांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. सायंकाळी ४.३० वाजता डॉ. प्रसाद यांनी प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांच्या वैयक्तिक भेटी घेतल्या.
३ ऑक्टोबर रोजी डॉ. प्रसाद यांनी मुंबई काँग्रेस कार्यालयाला भेट देऊन विविध बैठकांना संबोधित केले.
आज, रविवार, ४ ऑक्टोबर रोजी टिळक भवन येथे प्रदेश काँग्रेसच्या मीडिया, सोशल मीडिया आणि ‘ट्रेनिंग अँड कनेक्ट सेंटर’च्या टीमसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. तसेच सायंकाळी प्रदेशाध्यक्ष, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष, विधिमंडळ पक्ष व विधान परिषदेतील नेते, राज्याशी संबंधित AICC सचिव तसेच प्रदेश काँग्रेस आणि मुंबई काँग्रेसचे संघटन महासचिव यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती प्रदेश काँग्रेसने दिली आहे.
