मुंबई : भाजपाने काढलेल्या महिलांच्या विराट मोर्चातील आक्रोशामुळे कानठळ्या बसलेल्या जनाब संजय राऊत यांनी महिला शक्तीला विरोध करण्याच्या नादात महिलांसोबत जातीवाचक शब्दाचाही उल्लेख करत त्या समाजाचाही अपमान केला आहे. अशा पद्धतीचे शब्द वापरण्याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे. नारीशक्तीचा अपमान करण्याचे काम महाविकास आघाडीकडून केले जात आहे. मात्र देशातील नारीशक्ती तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा प्रहार भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी बुधवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
संजय राऊत, जर तुम्ही या विधेयकाला पाठिंबा दिला असता, महिला आरक्षण मंजूर केले असते तर आम्ही तुमचे अभिनंदन केले असते. या सगळ्या महिलांनी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंचे अभिनंदन केले असते. परंतु महिलांच्या हातात सत्ता आली तर आपल्याला भ्रष्टाचार करता येणार नाही, पत्रा चाळीमध्ये घोटाळा करता येणार नाही. पुन्हा संजय राऊत यांना राज्यसभेची खासदारकी मिळणार नाही म्हणून महिला आरक्षणाला विरोध करण्याचा प्रकार संजय राऊत, उबाठा गट आणि महाविकास आघाडीने केल्याचा आरोप श्री. बन यांनी केला.
