दापोली : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दापोली तालुका काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला असून दापोली नगरपंचायतीच्या सर्वच्या सर्व जागा स्वबळावर लढविण्याची घोषणा केली आहे. तसेच तालुक्यातील ६९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्येही काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची माहिती काँग्रेसचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष ॲड. विकास मेहता यांनी दिली.
दापोली शहरातील मेंदळे सभागृहात काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ॲड. विकास मेहता यांनी पक्षाची आगामी निवडणुकांबाबतची भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे दापोलीच्या स्थानिक राजकारणात काँग्रेसने स्वतंत्र वाटचालीचा बिगुल वाजविल्याचे मानले जात आहे.
नगरपंचायत निवडणुकीत कोणत्याही पक्षासोबत आघाडी अथवा तडजोड करण्याऐवजी काँग्रेस स्वतःच्या ताकदीवर सर्व जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचे मेहता यांनी स्पष्ट केले. त्यासाठी पक्ष संघटना मजबूत करण्यासोबतच प्रत्येक प्रभागात सक्षम उमेदवारांची चाचपणी आणि कार्यकर्त्यांची बांधणी केली जाणार आहे.
याचबरोबर दापोली तालुक्यातील ६९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांकडेही काँग्रेसने लक्ष केंद्रित केले आहे. या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्येही पक्ष स्वबळावर उमेदवार उभे करणार असल्याचे मेहता यांनी सांगितले. आगामी काळात गावागावात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
घराघरात जाऊन नागरिकांशी संवाद
केवळ निवडणुकीपुरते राजकारण न करता दापोली शहर आणि तालुक्यात प्रत्यक्ष घराघरात जाऊन नागरिकांचे प्रश्न जाणून घेण्यात येणार आहेत. नागरिकांच्या समस्या, स्थानिक पातळीवरील अडचणी आणि विकासाच्या अपेक्षा समजून घेऊन त्यावर खुली चर्चा करण्यात येणार असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले.
दरम्यान, काँग्रेसच्या संघटनेत भविष्यात मोठे फेरबदल करण्याचे संकेतही ॲड. विकास मेहता यांनी दिले. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून संघटना अधिक सक्रिय करण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या पातळीवर बदल करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसच्या या स्वबळाच्या भूमिकेमुळे आगामी नगरपंचायत आणि ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये दापोलीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी काळात काँग्रेस कोणत्या प्रभागातून कोणाला संधी देते आणि निवडणुकीची रणनीती कशी आखते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
या बैठकीला काँग्रेस जिल्हाध्यक्ष सोनलक्ष्मी घाग, दापोली तालुका काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष श्रीकांत मुंगसे, अतुल साळगावकर, जानकी बेलोसे, अर्जुन शिवण, सुहास घटे, रियाज तळगरकर, नितीन जाधव, दादू मुरमुरे, राजेश खन्ना यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
