नवी मुंबई :नवी मुंबईतील माथाडी कामगारांच्या मेळाव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एपीएमसीच्या पुनर्विकासासह दुष्काळाच्या परिस्थितीवर भाष्य केले. मेळाव्यात करण्यात आलेल्या मागण्यांची पूर्तता करून माथाडी कामगारांचे हित जोपासले जाईल, असे त्यांनी सांगितले. तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाने आज शासन निर्णय काढल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
एपीएमसी बाजाराच्या संपूर्ण पुनर्विकासाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जमिनीखाली आणि जमिनीवर बाजार उभारला जाणार असून, एपीएमसीच्या कारभारात यापुढे कोणताही भ्रष्टाचार होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असा दावा त्यांनी केला.
एपीएमसीचा संपूर्ण कारभार पारदर्शक पद्धतीने चालवला जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान, दुष्काळाच्या परिस्थितीवर बोलताना शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून चारा करपला आहे, तर पिकांतून उत्पन्न मिळण्याची परिस्थिती नसल्याचे त्यांनी नमूद केले. दुष्काळग्रस्तांना पूर्ण मदत देण्यासाठी शासन कटिबद्ध असून, त्यासाठी आजच शासन निर्णय काढल्याचे फडणवीस यांनी सांगितले.