खोपोली: नगरपालिका शालेय समितीच्या सभापती निवडीवरून नगराध्यक्ष व भाजप नगरसेवक आमने-सामने आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नगराध्यक्ष आम्हाला विश्वासात घेत नसल्याचा आरोप भाजप नगरसेवकांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
शालेय शिक्षण समिती माध्यमिक विभागाच्या सहा शाळा असून, या शाळांवर नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी सर्व शाळांवर सभापती पदांवर शिवसेना नगरसेवकांची वर्णी लावल्याने भाजप नगरसेवकांनी नगराध्यक्ष यांच्यावर प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. या नाराजीचे पडसाद आज भारतीय जनता पक्षाच्या तातडीने आयोजित केलेल्या पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत उमटले. भाजपचे अध्यक्ष अजय इंगुलकर यांनी खोपोली नगरपालिकेत शिवसेना-भाजप युती असताना नगराध्यक्षांनी भाजप नगरसेवकांबद्दल अशी भूमिका घेणे अयोग्य असल्याचे सांगताना, जर नगराध्यक्षांनी सहकार्याची भूमिका ठेवली नाही तर भविष्यात भाज्य भारतीय जनता पक्षाला याचा विचार करावा लागेल असा यावेळी इशारा दिला. नगराध्यक्ष शेंडे यांच्या मनमानी कारभाराविरोधात बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली. उपस्थित सर्वच नगरसेवकांनी शिक्षण समिती सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचे यावेळी सांगितले. नगराध्यक्षांच्या या भूमिके विरोधात पक्षाच्या बैठकीत निषेधार्थ पत्र देण्याविषयी ठरले. गुरुवारी सकाळी अजय इंगुलकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे पदाधिकारी व नगरसेवक यांनी नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांना निषेदाचे पत्र देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी नगराध्यक्षांच्या दालनात त उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, भाजप शहराध्यक्ष अजय इंगुलकर, सरचिटणीस विकास खुरपडे, विनायक माडपे, परिवहन सभापती किशोर पाटील, नियोजन सभापती प्रतीक्षा रेटरेकर, नगरसेविका अश्विनी अत्रे, नगरसेविका सानिया शेख, सह भाजप उपाध्यक्ष दिलीप पवार वन्य पदाधिकारी उपस्थित होते
भाजपा नगरसेवक शिक्षण समिती सदस्यत्वाचा राजीनामा देणार?…
