चिपळूण : कोकणच्या समृद्ध, पारंपरिक आणि वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृतीचे जतन करण्याच्या उद्देशाने रिगल कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड टुरिझम, कोंढे, चिपळूण येथील विद्यार्थ्यांनी साकारलेल्या ‘रिगल रेसिपी’ या विशेष पाककृती पुस्तकाचे अनावरण मा. योगेशदादा कदम साहेब, महसूल व गृहराज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते शुक्रवार, दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता रिगल हॉल, कोंढे, ता. चिपळूण येथे करण्यात येणार आहे.
कोकणच्या खाद्यपरंपरेमध्ये अनेक दुर्मिळ, अस्सल, पारंपरिक आणि आजच्या पिढीपासून हळूहळू दूर जात असलेल्या पाककृती आहेत. आधुनिक जीवनशैली आणि बदलत्या खाद्यसंस्कृतीच्या काळात या पारंपरिक पाककृतींचे जतन करून त्या पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने ‘रिगल रेसिपी’ हा अत्यंत महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे.
कोकणातील स्थानिक खाद्यपरंपरा आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे महत्त्व लक्षात घेऊन रिगल कॉलेजने २००८ साली कोकणात पहिल्यांदा परकार कॉम्प्लेक्स ला ‘रानभाजी पाककृती स्पर्धे’च्या माध्यमातून स्थानिक व रानभाज्यांच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतला होता. स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध असलेल्या, मात्र आधुनिक आहारपद्धतीतून हळूहळू दूर होत असलेल्या रानभाज्यांची ओळख नव्या पिढीला व्हावी, त्यांचे पोषणमूल्य आणि पारंपरिक उपयोग समजावेत तसेच या स्थानिक खाद्यसंपदेचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने महाविद्यालयाने हा उपक्रम सुरू केला.
आज विविध शैक्षणिक संस्था आणि संघटनांकडून रानभाजी, स्थानिक खाद्यपदार्थ आणि पारंपरिक खाद्यसंस्कृतीविषयक उपक्रम राबविले जात आहेत, ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे. या प्रकारच्या उपक्रमांना चालना मिळणे हे स्थानिक खाद्यवारसा आणि जैवविविधतेच्या संवर्धनासाठी महत्त्वाचे पाऊल आहे. रिगल कॉलेजने या विषयाची गरज ओळखून काही वर्षांपूर्वीच विद्यार्थ्यांना या क्षेत्राशी जोडण्याचा प्रयत्न केला, आणि त्याच विचाराचा पुढील टप्पा म्हणजे ‘रिगल रेसिपी’ हे पुस्तक होय.