नवी मुंबई : नवी मुंबईतील तुर्भे डम्पिंग ग्राउंडवर प्रस्तावित वेस्ट-टू-एनर्जी अर्थात सीबीजी प्रकल्पावरून राजकीय वातावरण तापलं आहे. या प्रकल्पाला शिवसेना नगरसेवकांनी विरोध करत आज पालिकेबाहेर सत्ताधारी भाजपविरोधात आंदोलन केलं.

प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप शिवसेना नगरसेवक अंकुश कदम यांनी केला आहे. कंत्राटदार अपात्र असतानाही त्याला काम देण्यात आल्याचा दावा करत या संपूर्ण प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

या प्रकल्पात दोन हजार कोटी रुपयांहून अधिक भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोपही अंकुश कदम यांनी केला आहे. निविदेतील तांत्रिक बाबींची तपासणी करून नियमबाह्य ठेकेदारावर कारवाई करावी, तसेच हा प्रकल्प अन्य ठिकाणी स्थलांतरित करावा, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे.