खालापूर : खालापूर पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी करत गहाळ झालेले तब्बल १८ मोबाईल फोन शोधून काढले आहेत. खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक तसेच बाहेरील नागरिकांचे मोबाईल गहाळ झाल्याच्या तक्रारी पोलिसांकडे दाखल झाल्या होत्या.

गहाळ मोबाईलचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी CEIR प्रणालीचा प्रभावी वापर केला. या माध्यमातून तब्बल ३ लाख ४ हजार २९९ रुपये किमतीचे १८ मोबाईल हँडसेट हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलं. हे मोबाईल रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध भागात तसेच इतर राज्यांमध्ये असल्याची माहिती CEIR प्रणालीच्या माध्यमातून मिळाली.

उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहूल आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंगटे यांच्या उपस्थितीत हस्तगत करण्यात आलेले सर्व १८ मोबाईल त्यांच्या मुळ मालकांना सुस्थितीत परत करण्यात आले. मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानत समाधान व्यक्त केलं.