मुंबई : पांडुरंगाच्या भेटीला जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये आणि त्यांना सर्वोत्तम सुविधा मिळाव्यात, यासाठी पुणे येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक शुक्रवारी पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच वारी मार्गावरील पाणी, वीज, स्वच्छता, विसावा केंद्रे, आरोग्य सुविधा, मदत केंद्रे, दिशादर्शक फलक तसेच एनएचएआय (NHAI) ची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिल्या.
आषाढी वारी-२०२६ च्या नियोजनाबाबतची आढावा बैठक पुणे येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला पालखी सोहळा विश्वस्त, विविध संस्थांचे प्रतिनिधी, पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते, मुक्कामस्थळे आणि विसावास्थळांची दुरुस्ती, आवश्यकतेनुसार टँकरची व्यवस्था, जर्मन हँगर, पाणीपुरवठा तसेच वैद्यकीय सुविधा, आरोग्य मनुष्यबळ, मेडिकल किट आणि एनडीआरएफ (NDRF) व एसडीआरएफ (SDRF) पथके सज्ज ठेवण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले.
