चिपळूण : शहरात भटक्या श्वानांसोबतच मोकाट गुरांचा उपद्रवही आता जीवघेणा ठरू लागला आहे. मध्यवर्ती बसस्थानकाशेजारील स्वागत रिक्षा स्टॉप येथे गुरुवारी, १२ नोव्हेंबर रोजी एका मोकाट बैलाने रिक्षाचालक बंड्या झगडे यांच्यावर भीषण हल्ला केला. बैलाने त्यांना शिंगावर उचलून रस्त्यावर आपटले. यात झगडे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कराड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

झगडे हे नेहमीप्रमाणे रिक्षा स्टॉपवर प्रवाशांची वाट पाहत होते. त्यावेळी तेथे मोकाट गुरांचा वावर होता. एका रागीट बैलामुळे महिला प्रवाशांना धोका निर्माण होऊ नये, म्हणून झगडे यांनी त्याला बाजूला हटवण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला बैल पुढे गेला, मात्र अचानक मागे वळून त्याने झगडे यांच्यावर हल्ला चढवला.

या हल्ल्यात झगडे यांच्या छातीला, बरगड्यांना आणि मणक्याला गंभीर दुखापत झाली आहे. स्थानिक रिक्षाचालक आणि नागरिकांनी धाव घेऊन बैलाला बाजूला हटवले, त्यामुळे त्यांची सुटका झाली. त्यांना प्रथम चिपळूणमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर झाल्याने कराडला हलवण्यात आले.

रिक्षा व्यवसायावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह असल्याने झगडे कुटुंबासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. तालुका रिक्षाचालक-मालक संघटनेचे अध्यक्ष दिलीप खेतले यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी कराड येथे जाऊन झगडे यांची भेट घेऊन मदतीचे आश्वासन दिले.

दरम्यान, नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळेच ही वेळ आल्याचा आरोप संघटनेने केला आहे. झगडे यांना नुकसानभरपाई आणि उपचारांचा संपूर्ण खर्च मिळावा, तसेच मोकाट जनावरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अन्यथा उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.