खेड :
रामदासभाई कदम यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश; राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) जिल्हा सरचिटणीस पदाचा राजीनामा
खेड तालुक्यातील राजकारणात मोठी घडामोड घडली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस तसेच खेडमधील ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. आनंदराव भोसले यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेना नेते रामदास कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
या वेळी जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम, शिवसेना रत्नागिरी जिल्हा विधी सेवा समितीचे अध्यक्ष ॲड. सुधीर बुटाला, उद्योजक शैलेश शेठ कदम, शिवसेनेचे तालुकाप्रमुख व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे तसेच अनेक वकील मंडळी आणि तिसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ॲड. आनंदराव भोसले हे खेड तालुक्यातील तिसंगी गावचे रहिवासी असून सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. ते माजी जिल्हा परिषद सदस्य असून रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे. याशिवाय ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस म्हणून कार्यरत होते.
भोसले हे तिसंगी पंचक्रोशी शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष तसेच खेड येथील आयसीएस महाविद्यालयाचे चेअरमन म्हणूनही काम पाहत आहेत. शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या कार्यामुळे त्यांना परिसरात विशेष मानाचे स्थान आहे.
शिवसेनेत प्रवेश करताना अॅड. भोसले यांनी शिवसेनेच्या विचारसरणीवर विश्वास व्यक्त करत पुढील काळात पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. तर रामदास कदम यांनी भोसले यांचे पक्षात स्वागत करत त्यांच्या अनुभवाचा आणि सामाजिक कामाचा शिवसेनेला मोठा फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला.
ॲड. आनंदराव भोसले यांच्या या प्रवेशामुळे खेड तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये काही प्रमाणात बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच शिवसेनेला स्थानिक पातळीवर संघटनात्मक बळकटी मिळेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
