चिपळूण : चिपळूण शहरातील प्रत्येक पात्र मतदारापर्यंत SIR फॉर्म भरण्याबाबतची माहिती प्रभावीपणे पोहोचावी आणि कोणताही नागरिक आवश्यक माहितीअभावी या प्रक्रियेपासून वंचित राहू नये, यासाठी चिपळूण नगर परिषदेच्या कचरा संकलन वाहनावरील ध्वनीक्षेपकाद्वारे जनजागृतीपर संदेश प्रसारित करण्यात यावेत, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे चिपळूण शहरप्रमुख श्री. सचिन (भैय्या) कदम यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन त्यांनी चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, सध्या SIR फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू असून या प्रक्रियेत जास्तीत जास्त नागरिकांचा सहभाग होणे आवश्यक आहे. मात्र अनेक नागरिकांना आवश्यक कागदपत्रे, प्रक्रिया किंवा अंतिम मुदतीबाबत पुरेशी माहिती नसल्याने अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नगर परिषदेच्या दैनंदिन कचरा संकलन वाहनावरील ध्वनीक्षेपकाचा वापर करून जनहिताचा संदेश प्रसारित केल्यास शहरातील प्रत्येक नागरिकापर्यंत ही माहिती सहज पोहोचू शकते.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, SIR फॉर्म भरताना घरातील सर्व मतदारांची आवश्यक कागदपत्रे, ओळखपत्रांचे पुरावे तसेच पासपोर्ट आकाराचे छायाचित्रे तयार ठेवावीत. त्यामुळे फॉर्म भरण्याची प्रक्रिया अधिक जलद, सुलभ आणि अचूकपणे पूर्ण होण्यास मदत होईल. तसेच अधिक माहितीसाठी संबंधित बूथस्तरीय अधिकारी (BLO) किंवा अधिकृत केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.