दापोली:- दापोली-सारंग-कळंबट-अडखळ मार्गाची गेल्या ७ ते ८ वर्षांपासून अत्यंत बिकट अवस्था झाली असून, स्थानिक नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रशासनाला वेळोवेळी निवेदने देऊनही आणि तक्रारी करूनही रस्ता दुरुस्तीकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे.
मुख्य समस्या आणि नागरिकांचे प्रवासाचा वेळ वाढला पूर्वी दापोली ते कळंबट या १५ किलोमीटरच्या प्रवासासाठी केवळ अर्धा तास लागायचा. मात्र, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे आता हाच प्रवास पूर्ण करण्यासाठी पाऊण ते एक तासाचा वेळ लागत आहे.
नागरिक व विद्यार्थ्यांचे हाल रस्त्याच्या खराब परिस्थितीमुळे शाळकरी मुले, नियमित एसटी वाहतूक आणि तातडीच्या वेळी आजारी रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
अतिभार वाहतुकीमुळे रस्ता उद्ध्वस्त या रस्त्याची क्षमता नसतानाही डंपर आणि रेतीची अतिभार (ओव्हरलोड) वाहतूक सुरू आहे. पर्यायी मार्ग (उदा. आंजर्ले मार्ग) उपलब्ध असतानाही लहान रस्त्यावरून अवजड वाहतूक केली जात असल्याने रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे.
प्रशासनाची टोलवाटोलवी तहसील कार्यालय आणि सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही केवळ “काम मंजूर आहे” किंवा “निधी उपलब्ध नाही” अशी उत्तरे देऊन थातूरमातूर मलमपट्टी केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
गेल्या १०-१२ वर्षांपासून केवळ आश्वासने दिली जात आहेत. रस्त्याची दुरुस्ती न करता फक्त वरवरचे काम दाखवून निधीचा गैरवापर केला जात आहे. या विलंबाला आणि नागरिकांच्या त्रासाला नेमके जबाबदार कोण?”

स्थानिक रहिवासी
सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रशासनाने यावर तात्काळ ठोस उपाययोजना करून ओव्हरलोड वाहतुकीवर बंदी घालावी व रस्त्याचे कायमस्वरूपी काम पूर्ण करावे, अशी ठाम मागणी परिसरवासीयांकडून केली जात आहे.