रायगड :जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात प्रस्तावित असलेल्या टोरेंट पॉवरच्या ३ हजार मेगावॅट क्षमतेच्या जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पाविरोधात आता शेतकरी कामगार पक्षाने आक्रमक भूमिका घेतलीये . माजी आमदार बाळाराम पाटील आणि शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने व शेकडो कार्यकर्त्यांनी साय डोंगर परिसरातील वृक्षतोडीची पाहणी केली. यावेळी वृक्षतोड झालेल्या जागेवर वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला.

या प्रकल्पामुळे सह्याद्रीच्या जंगलाचे नुकसान होण्याची, वन्यजीवांच्या अधिवासावर परिणाम होण्याची आणि स्थानिकांच्या पाणी व शेतीविषयक प्रश्नांमध्ये वाढ होण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे स्थानिकांचा विरोध डावलून हा प्रकल्प पुढे रेटला जात असल्याचा आरोपही विरोधकांकडून करण्यात येत आहे.

“स्थानिकांचा विरोध डावलून होणारा हा प्रकल्प कदापी होऊ देणार नाही,” असा स्पष्ट इशारा राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी दिला आहे. माजी आमदार बाळाराम पाटील यांनी देखील राज्य सरकारवर टिकेची झोड उठवली.

त्यामुळे टोरेंट पॉवर प्रकल्पावरून कर्जतमधील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे असून, स्थानिकांचा विरोध आणि पर्यावरणाचा मुद्दा आता पुन्हा ऐरणीवर आला आहे. शेकापने देखील स्थानिकांच्या भूमिकेला पाठिंबा दिल्याने या लढ्याला अधिक बळ मिळालेय.

या प्रकल्पाला विरोध अधिक तीव्र होणार की प्रशासन आणि प्रकल्प व्यवस्थापन स्थानिकांच्या प्रश्नांवर तोडगा काढणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेये .