चिपळूण (विशेष प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावरील सर्वात लांब ठरलेल्या चिपळूणच्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे मात्र जोडरस्त्याचे काम अपूर्ण आहे. हे काम सध्या तरी गणेशोत्सव झाल्यानंतरच हाती घेण्यात येणार आहे. मात्र सध्या पावसाने विश्रांती घेतली असल्यामुळे उड्डाणपुलावर डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. बहादुरशेखपासून हॉटेल अतिथीपर्यंत चिपळूणचा उड्डाणपूल १,८४० मीटर लांबीचा आहे. उड्डाणपुलावरील सर्व स्लॅबचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे ठेकेदार कंपनीकडून उड्डाणपुलावर आता डांबरीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. संपूर्ण उड्डाणपुलावर डांबरीकरण व्हायला काही दिवसांचा अवधी लागू शकतो तर जोडरस्त्याचे काम गणपती झाल्यानंतरच हाती घेण्यात येणार आहे. कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून चिपळूणच्या उड्डाणपुलाखालून जाणाऱ्या दोन्ही सर्व्हिस रोड ची एक एक लेन वाढविण्यात येत आहे. तसेच साईडपट्यांची दुरुस्तीही केली जातेय. चिपळूणमधून जाणाऱ्या चाकरमान्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे.

एकीकडे चिपळूणच्या उड्डाणपुलावर डांबरीकरणाचे काम सुरु आहे तर सर्वात आधी लागणाऱ्या इंदापूर आणि माणगाव बायपासचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना इंदापूर आणि माणगाव येथे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणार असल्याची शक्यता व्यक्त होते. कोकणात लाखो चाकरमानी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी येतात. खासगी बसेस आणि वाहने यांची संख्या काही हजारांवर आहे. त्याशिवाय एसटी महामंडळाकडूनही मोठ्या प्रमाणात गाड्या धावणार आहेत. या सर्वांचा परिणाम वाहतूक कोंडीवर होऊ नये म्हणून कोकणाकडे येणारी वाहतूक ही कोल्हापूर मार्गी देखील वळविण्यात येऊ शकते असा अंदाज आहे. त्यामुळे चाकरमान्यांनी पुरेशी माहिती घेऊनच प्रवासाचे नियोजन करणे हितावह ठरेल.