मुंबई- सणाचं पावित्र राखलं पाहिजे, त्यात गोंगाट असण्याची गरज नाही असं सांगत उद्धव ठाकरेंनी डीजेबंदीवर स्पष्ट भूमिका मांडली आहे. मातोश्रीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी जनतेच्या आनंदासाठी उत्सव असावेत, त्रास देण्यासाठी नको असं म्हटलं आहे. तसंच यासंदर्भात गणेशोत्सव मंडळांशी चर्चा करायला हवी असं मत मांडलं आहे. लोकांना उत्सव हवा आहे, पण त्यातून होणारा जाच नको असंही त्यांनी म्हटलं आहे.
डीजेबंदीसंदर्भात विचारलं असता ते म्हणाले, “सणाचं पावित्र राखलं पाहिजे, त्यात गोंगाट असण्याची गरज नाही. लोकमान्य टिकळांनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत अधिक लोक सहभागी व्हावेत सणांची चळवळ केली. थोडक्यात लोकमान्य टिकळांनी सणांची चळवळ केली, त्यानंतर स्वातंत्र्य मिळालं. नंतर चळवळीचं रुपांतर उत्सवात झालं. आता उत्सवाचं रुपांतर गोंगाटात होऊ नये. गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत रोंबासोंबा नावाचा अत्यंत हिणकस असा नृत्य प्रकार सुरु झाला होता. सुदैवाने जनतेला तो कळला आणि आता बंद झाला. आताही दणदणाट करणं योग्य नाही. जनतेच्या आनंदासाठी उत्सव असावेत, त्रास देण्यासाठी नको.
मुख्यमंत्र्यांनी यावर आधी चर्चेची गरज आहे असं म्हटलं आहे. त्यावर ते म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांकडेच गृहखातं आहे. आधी आयुक्तांची बैठक घेऊन एकवाक्यता करा. तुम्ही चर्चा कोणाशीच करत नाही आहात. जो प्रश्न उचलच आहे त्यालाच उचलून आत टाकलं जात आहे. संतोष पंडित, विद्यानंद बापट यांच्याशी चर्चा का करत नाही. कोण बरोबर हे चर्चेचून ठरवा. अन्यथा लोक रस्त्यावर उतरलीच नसती. लोकांना उत्सव हवा आहे, पण त्यातून होणारा जाच नको. प्रत्येक ठिकाणी डेसिबल मोजलं जातं, त्याप्रमाणे अंमलबजावणी कोण करणार? बापट, इतरांशी चर्चा करण्याआधी गणेशोत्सव मंडळाशी का करत नाही? मी मंडळांची बैठक घ्यायचो आणि त्यातून प्रयत्न असायचा की, लोकांना शिक्षण मिळावं. बऱ्याच मंडळांनी देखाव्यात यासंदर्भात गोष्टी मांडल्या होत्या. नीट चर्चा केली तर टोकापर्यंत ताणलं जात नाही. वेळेची कालमर्याचा ठरवा. इतके स्पीकर लावण्याची गरज नाही सांगा. पारंपारिक वाद्य असताना यांची गरज आहे का?,” असंही ते म्हणाले.
