लांजा : लांजा शहराचा वाढता विस्तार त्यानुसार नागरिकांची गरज पाहता शहरामध्ये नागरिकांना व्यायाम तसेच आनंददायी वातावरण मिळावे, या उद्देशाने ‘नमो उद्यान’ साकारण्यात येणार आहे. आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेले हे उद्यान लांजावासीयांसाठी एक सुंदर आणि शहराच्या सौंदर्यात मोठी भर पडणार असून विकासाचा नवा चेहरा नागरिकांसमोर येणार आहे असे प्रतिपादन आमदार किरण सामंत यांनी केले.
लांजा शहरामध्ये एक कोटी रुपये खर्च करून नमो उद्यान उभारण्यात येणार आहे. या उध्यानाच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी आमदार किरण सामंत बोलत होते. याप्रसंगी नगराध्यक्षा सौ. सावली कुरूप, उपनगराध्यक्ष बाबा लांजेकर, बांधकाम सभापती वैभव जोईल, पाणी सभापती नेवरेकर, महीला बालकल्याण सभापती प्रणाली तेली, मुख्याधिकारी अभिजीत कुंभार, योगेश कावतकर, सर्व नगरसेवक, शिवसेना तालुका प्रमुख गुरुप्रसाद देसाई, जयवंत शेट्ये, नाना मानकर, गणीहसन मुल्लाणी नागरीक उपस्थित होते.
आमदार किरण सामंत बोलताना पुढे म्हणाले की, लांजा शहराच्या विकासाला आपले प्राधान्य असल्याने लांजावासीयांना अभिमान वाटेल असे नमो उद्यान उभारले जाणार आहे. शहराच्या विकासासाठी आवश्यक विविध कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जाणार आहे. उद्यानामध्ये नागरिकांसाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यामध्ये लहान मुलांसाठी खेळण्याची जागा, नागरिकांसाठी फिरण्यासाठी प्रशस्त परिसर, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुशोभीकरणाच्या माध्यमातून आकर्षक वातावरण निर्माण करण्यात येणार आहे. त्यामुळे सकाळ-संध्याकाळ नागरिकांना निवांत वेळ घालवण्यासाठी तसेच आरोग्याची काळजी घेण्यासाठी हक्काची जागा उपलब्ध होणार आहे. तसेच विकासकामांमध्ये नागरिकांच्या अपेक्षा आणि गरजा लक्षात घेऊन कामे करण्यावर भर दिला जाणार आहे. लांजा शहरासह मतदारसंघातील विविध भागांमध्ये पायाभूत सुविधा, सार्वजनिक सुविधा आणि नागरिकांच्या हिताची कामे करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे आमदार किरण सामंत यांनी सांगितले.
आमदार किरण सामंत यांच्याहस्ते नमो उद्यानाचे भुमीपूजन..
