मुंबई : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यातील वातावरण पुन्हा तापत असताना सरकारने विलंब न करता तोडगा काढावा,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना केली आहे.
शशिकांत शिंदे बोलताना म्हणाले की,मुख्यमंत्री मराठा आणि ओबीसी समाजाच्या उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करत आहेत. या बैठकीतून काय निष्पन्न होते, हे पाहावे लागेल. मात्र, उत्सवांच्या तोंडावर सामाजिक तणाव निर्माण होणे योग्य नाही. त्यामुळे सरकारने दोन दिवसांत मार्ग काढावा,असे शशिकांत शिंदे बोलताना म्हणाले.
शशिकांत शिंदे म्हणाले की,मनोज जरांगे पाटील यांचे समाधान होत नसल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेले वक्तव्य हे सरकारच्या अपयशाचे चित्र आहे,निवडणुकीच्या काळात राजकीय फायद्यासाठी आश्वासने देऊन सत्ता मिळवली;आता त्या आश्वासनांचे उत्तर देण्याची वेळ आली आहे. प्रत्येक समाजाला आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना आहे. त्यामुळे आता सरकारची परीक्षा आहे,असे शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
शशिकांत शिंदे म्हणाले की,मराठा आंदोलनाच्या प्रश्नावर सरकारमध्ये अंतर्गत स्पर्धा सुरू आहे, सरकारकडून दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे,मात्र जाणीवपूर्वक दिलेली आश्वासने आता पूर्ण होत नसल्याची भावना जरांगे पाटील यांच्यात निर्माण झाली आहे. अंतर्गत स्पर्धेमुळे आश्वासने पाळली जात नाहीत का, असा प्रश्न निर्माण होत असून त्याचा फटका सामान्य जनतेला बसत आहे,असेही शशिकांत शिंदे म्हणाले.
पुढे बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की,MPSCच्या मुद्द्यावर रस्त्यावर उतरलेल्या तरुणांना पाठिंबा देणे हे सर्व राजकीय पक्षांचे कर्तव्य आहे. आंदोलन करणाऱ्या तरुणांच्या राजकीय सहभागाबाबत कोणी वक्तव्य करत असेल, तर ती आंदोलनाची थट्टा आहे.अशा वक्तव्यांचे परिणाम संबंधितांना महागात पडतील, असा इशाराही शशिकांत शिंदे यांनी दिला आहे.
शशिकांत शिंदे म्हणाले की,MPSC अध्यक्षांनी परीक्षेत चूक झाल्याचे मान्य केल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आताचे अध्यक्ष आणि सचिव यांना जबाबदार धरले जाणार का, यापूर्वी अशा घटना घडल्या की संबंधित मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागत होता. आता एवढे पेपर फुटूनही राजीनामा होत नसेल तर त्याची किंमत सरकारला मोजावी लागेल, असेही शशिकांत शिंदे म्हणाले.
शशिकांत शिंदे म्हणाले की,DJवरील निर्बंध सरकारने नव्हे तर न्यायालयाने घातले आहेत. सण साजरा करताना नियमांचे पालन झाले पाहिजे. DJला परवानगी दिली तर त्याला आमची हरकत नाही. मात्र सरकार कायदा करणार आहे की नाही, हे स्पष्ट झाले पाहिजे. गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी,उत्सवांना वेगळे स्वरूप दिले जात असून अश्लील नृत्यांसारख्या प्रकारांवर सरकार आणि पोलिसांनी नियमावली लागू करावी,सण कोणत्या धर्माने करावा, याचे सूत्र राजकीय फायद्यासाठी मांडले जात आहे. दहीहंडीमध्ये मुस्लिम तरुण सहभागी झाला होता. तो एकतेचा थर आहे,असे शशिकांत शिंदे यांनी बोलताना सांगितले आहे.
यावर सविस्तर बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की,आम्ही राज्याचा आढावा घेत आहोत. धरणांमधील पाणी मोठ्या प्रमाणात सोडले तर एप्रिल-मे महिन्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ शकते. दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी करणार आहोत. पुढील १० ते १५ दिवस परिस्थिती पाहू आणि त्यानंतर शेतकऱ्यांसोबत उभे राहू, विलीनीकरणाबाबत आमच्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही. आम्ही आंदोलनाला सुरुवात केली की अशा बातम्या येतात. अजितदादा असताना असा निर्णय झाला होता; मात्र आता याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही,नगरसेवक पद रद्द करण्याची कारवाई ही धमकीसारखी आहे. तांत्रिक चुका दाखवून विरोधकांना अपात्र केले जात आहे. सत्ताधाऱ्यांचे अर्ज जलदगतीने निकाली काढले जातात, मग विरोधकांच्या अर्जांवर निर्णय का होत नाही? आपल्या सोयीने निकाल लावले जात असून विरोधकांच्या अपीलवर ‘तारीख पे तारीख’ सुरू आहे. असेही शशिकांत शिंदे बोलताना म्हणाले.