मुंबई : भोंदूबाबा अशोक खरातच्या इशानेश्वर मंदिराला देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने २०१८ साली १.५ कोटी रुपयांचा निधी दिला होता. फडणवीसांच्या कार्यालयात त्यावेळी कार्यरत असणारे व आता म्हाडाचे अधिकारी मिलिंद बोरीकर यांचेही या बाबाशी अत्यंत जवळचे संबंध असल्याची माहिती मिळत आहे. अशोक खरात प्रकरणात सरकारने प्रामाणिकपणे कारवाई केली तर डझनभर मंत्री आणि दोन डझन अधिकारी जेलमध्ये जातील, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी X वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचेही या भोंदूबरोबरचे फोटो समोर आले आहेत. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचेही या भोंदू खरातशी अत्यंत जवळचे संबंध होते. त्यांनीही मुख्यमंत्री होण्यासाठी या बाबाकडून अघोरी पूजा केल्याची माहिती मिळत आहे. भोंदूबाबाचे कारनामे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सहा महिन्यांपासून माहीत होते. मात्र, त्यांच्या आजूबाजूचे लोक आणि मंत्रिमंडळातील सहकारी यांचे अशोक खरातशी संबंध असल्याने माहिती मिळूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणतीही कारवाई केली नव्हती. परंतु, त्यांच्या मित्रपक्षातील सहकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपद घालवण्यासाठी खरातकडून तंत्र-मंत्र व अघोरी पूजा केल्यानेच फडणवीसांनी भोंदूबाबा अशोक खरातविरोधात कारवाई केली. भोंदू बाबा अशोक खरातच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस आता मित्रपक्ष आणि स्वतःच्या पक्षातील हितशत्रूंना ब्लॅकमेल करत आहेत, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.