मुंबई – मुंबई कधी थांबत नाही… मुंबई थकत नाही आणि मुंबई कधीच हार मानत नाही… मुंबईच्या याच जिद्दीला, ऊर्जेला आणि सकारात्मक वृत्तीला सलाम करणारी टाटा मुंबई मॅरेथॉन आता केवळ क्रीडा स्पर्धा राहिलेली नसून मुंबईच्या अस्मितेचा आणि महाराष्ट्राच्या क्रीडा संस्कृतीचा अविभाज्य भाग बनली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.

‘टाटा मुंबई मॅरेथॉन २०२७ च्या ड्रीम रन’च्या नोंदणी शुभारंभाचा कार्यक्रम उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आला होता.

यावेळी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, ‘टीसीएस’च्या इंडिया बिझनेस अँड स्ट्रॅटेजिक अकाउंट्स-ग्रोथ मार्केट्सचे अध्यक्ष उज्ज्वल माथूर, आयडीएफसी फस्ट बँकचे चीफ मार्केटिंग ऑफिसर श्रीपाद शेंडे, प्रोकॅम इंटरनॅशनलचे जॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर विवेक सिंग, निवृत्त सनदी अधिकारी अभिमन्यू काळे यांच्यासह टाटा मुंबई मॅरेथॉनचे पदाधिकारी उपस्थित होते.

२००४ मध्ये सुरू झालेल्या टाटा मुंबई मॅरेथॉनने गेल्या दोन दशकांहून अधिक काळात देश-विदेशातील धावपटूंना मुंबईकडे आकर्षित केले असून, लाखो नागरिकांना फिटनेसची प्रेरणा दिली आहे. क्रीडा, सामाजिक बांधिलकी आणि लोकसहभाग यांचा सुंदर संगम या मॅरेथॉनच्या माध्यमातून घडत आहे. यंदा आपण मॅरेथॉनची २२ वी आवृत्ती अनुभवणार आहोत. हा केवळ २२ वर्षांचा प्रवास नाही, तर २२ वर्षांची जिद्द, ऊर्जा, प्रेरणा आणि लाखो स्वप्नांची धाव आहे असेही सुनेत्रा पवार म्हणाल्या.

क्रीडा व युवक कल्याण विभागाची जबाबदारी सांभाळताना महाराष्ट्रात खेळ हा केवळ स्पर्धेचा विषय न राहता प्रत्येकाच्या जीवनशैलीचा भाग व्हावा, हे आपले ध्येय असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ‘फिट महाराष्ट्र, सक्षम महाराष्ट्र’ हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी टाटा मुंबई मॅरेथॉनसारख्या उपक्रमांची मोठी मदत होत आहे. टाटा मुंबई मॅरेथॉनचा प्रभाव केवळ क्रीडा क्षेत्रापुरता मर्यादित नसून पर्यटन, प्रवास, फिटनेस, क्रीडा साहित्य आणि तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांना त्यातून चालना मिळते. यंदाच्या मॅरेथॉनमुळे सुमारे साडेसहाशे कोटी रुपयांचे आर्थिक मूल्य निर्माण होण्याची अपेक्षा आहे असे सांगितले.

‘टाटा मुंबई मॅरेथॉन’चे क्रीडा स्पर्धेतून एका चळवळीत रूपांतर झाले आहे. प्रशासन, महानगरपालिका आणि पोलिसांना एकत्र आणणारा उपक्रम म्हणून सुरू झालेली ही स्पर्धा आज जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त मॅरेथॉन बनली आहे. तिचा प्रभाव शर्यतीपलीकडे विस्तारला असून, फिटनेस आणि सक्रिय जीवनशैलीबद्दल अधिक जागरूकता निर्माण करतो. तसेच मुंबईची ऊर्जा, उत्साह आणि भावना जगभरातील प्रेक्षकांसमोर मांडतो. टाटा मुंबई मॅरेथॉन हे खरोखरच शहराला जोडणारे आणि मुंबईला जागतिक क्रीडा नकाशावर स्थान मिळवून देणारे एक व्यासपीठ आहे असे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ म्हणाले.