मंडणगड : महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटना तालुका शाखा मंडणगड यांच्यावतीने आज भिंगळोली येथील एस.टी. आगारात कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रतिकात्मक घंटानाद आंदोलन करण्यात आले. दिवाळी बोनससह कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनामध्ये एस.टी. कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत आपल्या मागण्यांसाठी एकजूट दाखवली. घंटानादाच्या माध्यमातून शासन आणि एस.टी. महामंडळ प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.
याचबरोबर महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी मंडणगड तहसील कार्यालयात जाऊन आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
एस.टी. कर्मचाऱ्यांच्या आर्थिक व सेवाविषयक प्रश्नांची गांभीर्याने दखल घेऊन शासनाने प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. या आंदोलनामुळे एस.टी. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना पुन्हा एकदा वाचा फुटली आहे.
एस.टी. कर्मचाऱ्यांचे भिंगळोली आगारात घंटानाद आंदोलन…!
